गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरूवात. महाराष्ट्रीयन जेवणामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी खास बेत असतो. अगदी साग्रसंगीत या दिवशी जेवण केलं जातं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पुरी, बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर, वरण – भात, खोबऱ्याची चटणी, श्रीखंड, पुरणपोळी, साखरभात, पुरण, खीर, घाटलं असा अगदी भरमोठा बेत केला जातो. यामध्ये लोणचं आणि पापडही असतात. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी गुढीपाडव्याला काही खास महाराष्ट्रीन खाद्यपदार्थ आवर्जून केले जातात. यासाठी आम्ही तुमच्यासोबत काही खास पदार्थांच्या रेसिपिज शेअर केल्या जातात.
1. पुरणपोळी रेसिपी (Puran Poli Recipe in Marathi)
पुरणपोळी हा महाराष्ट्रातील एक विशेष खाद्यपदार्थ आहे हो विविध सणांना घरोघरी केला जातो. मात्र गुढीपाडव्याला पुरणपोळीचा बेत हा हमखास केला जातो.
पुरळपोळी तयार करण्यासाठी साहित्य –
एक कप हरबरा डाळ, एक किसलेला गुळ, एक कप मैदा आणि एक कप गव्हाचे पीठ, वेलची पूड
पुरणपोळी तयार करण्याची कृती –
हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. त्यातील पाणी काढून त्यात किसलेला गुळ टाका आणि मंद आचेवर मिश्रण शिजवून घ्या. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात वेलची पूड घालून ते मिक्सर अथवा पुरणयंत्रात वाटून घ्या. चमचाभर तेल लावून सैलसर कणीक मळून घ्या. कणकेची पारी तयार करून त्यात पुरणाचा गोळा भरा आणि अलगद पारीचे तोंड बंद करा. पोळी लाटून तूपावप खरपूस शेकवा. गरमागरम पोळी तूप, दुध आणि कटाच्या आमटीसोबत अगदी मस्त लागते.
2. श्रीखंड रेसिपी (Shrikhand Recipe in Marathi)
गुढीपाडव्याला घरात आवर्जून करण्यात येणारा एक खास पदार्थ म्हणजे श्रीखंड अथवा आम्रखंड. आजकाल बाजारात विविध फ्लेवर्सचे श्रीखंड तयार मिळतात.
श्रीखंड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –
चक्का, साखर, वेलची , जायफळ
श्रीखंड तयार करण्याची कृती –
श्रीखंडासाठी तुम्ही एक दिवस आधी दही लावून घ्या. त्यानंतर त्याचा चक्का बनवून घ्या. चक्का बनवण्यासाठी तुम्हाला दही फडक्यामध्ये घालून पूर्ण रात्रभर ठेवायचं असतं. त्यातील पूर्ण पाणी निघून जाऊन त्याचा चक्का तयार होतो. हा चक्का काढून नंतर त्यामध्ये साखर मिक्स करून राहू द्या. जितका चक्का तितकी साखर असं प्रमाण असू द्या. त्यानंतर हे मिश्रण चाळून घ्या. त्यातून जे मिश्रण येईल त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ घालून चविष्ट श्रीखंड खायला घ्या.
3. बटाटा पुरी भाजी
नैवेद्याच्या पानात महत्त्वाचे असतात ते घरी तयार केलेले खास पदार्थ. यासाठीच गुढीपाडव्याला खास बटाटपुरी भाजी केली जाते.
बटाटा पुरी भाजीसाठी लागणारे साहित्य –
भाजी – बटाटे, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता, कोथिंबिर, तेल, साखर, हिंग, हळद, मीठ, खोबरं
पुरी – गव्हाचे पीठ, मीठ, पाणी, तेल
बटाटा पुरी भाजी करण्याची कृती –
बटाटे शिजवून मध्यम आकाराचे तुकडे करावेत. तुकड्यांवरच थोडी साखर, हिंग, हळद आणि चवीपुरतं मीठ घालावं. (कढईत हे असं टाकल्यास, सर्व बटाट्याला त्याची व्यवस्थित चव लागते) कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग, कडीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि हवं असल्यास, आल्याचे तुकडे घालावेत. थोडं परतून त्यावर बटाट्याच्या फोडी परताव्यात. एक वाफ काढावी. गरमागरम भाजी तयार. त्यावर कोथिंबीर चिरून घालावी. तुम्हाला आवडत असल्यास, खरवडलेलं खोबरं घातलं तरीही चालेल. (नेवैद्यासाठी कांदा घालत नसल्यामुळे कांदा घालणं सहसा टाळलं जातं) गव्हाचं पीठ त्यात तेल, मीठ घालून पाण्याने भिजवा. थोडं घट्ट भिजवा. पुरीचं पीठ हे पोळीच्या पिठाप्रमाणे सैलसर नसावे. सैलसर भिजवल्यास पुरी फुगत नाही. त्यानंतर तुम्हाला जर पटापट पुरी करायची असेल आणि गोलाकार आकाराचीच हवी असेल. तर पोळपाटभर एक थोडी जाडी पोळी लाटून घ्या आणि मग स्टीलच्या काठ असलेल्या वाटीने त्यावर छाप मारा. म्हणजे एका आकारात पुऱ्या दिसतात.
4. डाळिंबी उसळ
डाळिंबीची उसळ हा पदार्थ महाराष्ट्रिन स्वयंपाकात असतोच. डाळिंब्यांची उसळ करण्यासाठी आधीच तयारी करावी लागते. यासाठी दोन दिवस आधी वाल भिजत घाला आणि एक दिवसभिजलेल्यानंतर आदल्या दिवशी ते एका सुती कापडात गुंडाळून ठेवा. ज्यामुळे त्याला छान मोड येतील.
डाळिंबी उसळ करण्याचे साहित्य –
सोललेले वाल, तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, सुके खोबरे, गुळ, आमसुल, कोथिंबीर, ओला नारळ, मीठ
डाळिंबी उसळ करण्याची कृती –
मोड आलेले वाल कोमट पाण्यात भिजवून सोलून ठेवा. कढईत किसलेला सुका नारळ, जिरे भाजून मिक्सरमध्ये वाटून घ्या, कढईत तेलाची फोडणी करा. त्यात जिरे, हिंग, तिखट कढीपत्ता, कोथिंबीर घालून डाळिंब्या परतून घ्या. पाणी टाकून त्यात जिरे खोबऱ्याचे वाटण टाका, आमसुल आणि मीठ टाकून वा येऊ द्या. डाळिंब्या शिजल्या की वरून ओले खोबरे पेरा.
5. खीर (Kheer Recipe In Marathi)
महाराष्ट्रात निरनिराळ्या प्रकारच्या खीर केल्या जातात. तुम्ही तांदूळ, गहू, रवा, साबुदाणे , शेवया अशा अनेक प्रकारच्या खीर नैवेद्यासाठी करू शकता.
खीर तयार करण्यासाठी साहित्य –
शेवया, तूप, दूध, साखर, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स
खीर करण्यासाठी लागणारी कृती –
शेवया तूपामध्ये भाजून घ्याव्यात. त्यानंतर दूध गरम करून घ्यावं. शेवया भाजून झाल्यानंतर त्यात गरम दूध, साखर घालून त्याला मंद आचेवर उकळी देत राहावं. नंतर त्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास वेलची पावडर आणि इतर ड्रायफ्रूटस घालावेत.
6. पुरण –
पुरणपोळीप्रमाणेच पुरणाचाही नैवेद्य दाखवला जातो. जर तुम्हाला पुरणपोळ्या बनवण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही पुरणाचा नैवेद्यदेखील दाखवू शकता.
पुरण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –
चणाडाळ, गूळ, जायफळ, वेलची पावडर
पुरण तयार करण्याची कृती –
चणाडाळ शिजवून घ्यावी. गूळ चिरून घ्यावा. त्यानंतर शिजलेली चणाडाळ आणि गूळ मिक्स करून पुन्हा शिजवावे. त्याला सुटलेलं पाणी थोडं कमी होऊ द्यावं. त्यामध्ये जायफळ पावडर अथवा वेलची पावडर घालून तुम्ही ते सर्व्ह करू शकता.
7. साखरभात –
घरात स्वयंपाकाचा खास बेत असेल तर साध्या वरणभातासोबत केला जाणारा एक पदार्थ म्हणजे साखरभात.
साखरभातासाठी लागणारे साहित्य –
तांदूळ, तूप, लवंग, केशर, साखर, पाणी, ड्रायफ्रूट्स, वेलचीपूड
साखरभात करण्याची कृती –
एका पॅनमध्ये तूप गरम करून हलके परतून घ्यावेत. त्यातच नंतर लवंगा घालून निथळून ठेवलेले तांदूळ परतून घ्यावेत. परतलेल्या तांदळामध्ये दोन वाट्या पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्या. शिजवलेला भात ताटात काढून पसरवून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये साखर आणि आणि पाव वाटीपेक्षा थोडं कमी पाणी घालून एकत्र करा. त्यात भाजलेलं केशर घाला आणि गोळीबंद पाक करा. पाक खूप पातळ ठेऊ नका. नाहीतर भात मिसळल्यास, तो पाणचट होईल. पाक चिकट झाला तर त्यात गार केलेला भात घाला. त्यामध्ये तळलेले काजू, बदामामचे काप आणि बेदाणे घालावेत आणि झाकून मंद आचेवर दोन वाफा काढाव्यात. वरून नाजूक तूप सोडावं. थोडा गार झाल्यावर वेलचीपूड घालावी. हा भात आदल्या दिवशी करून ठेवावा. कारण त्यामध्ये पाक छान मुरतो आणि दुसऱ्या दिवशी त्यामुळे भात चवीला छान लागतो.
8. मसाले भात रेसिपी
मसालेभातामुळे तुमचा स्वयंपाकाचा बेत अगदी परिपूर्ण होतो. कारण अनेकांना भात जेवल्याशिवाय पोट भरल्यासारखे वाटत नाही.
मसालेभातासाठी लागणारे साहित्य –
तांदूळ, मटार अथवा आवडीप्रमाणे इतर भाज्या, गोडामसाला, कढीपत्ता, काजू, मीठ, लाल तिखट, कोथिंबिर, खोबरे, तेल, फोडणीचे साहित्या, गरम पाणी,
मसालेभात करण्याची कृती –
तांदूळ धुवून कमीतकमी अर्धा तास निथळत ठेवा. जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवून नेहमीप्रमाणे फोडणी तयार करा. कढीपत्ता, काजू टाकून परतून घ्या. त्यावर मटार आणि आवडीप्रमाणे भाज्या टाकून परतून घ्या. परतेल्या भाज्यांवर तांदूळ टाकून परतून घ्या आणि वरून मीठ, तिखट, गोडा मसाला, चिरलेली कोथिंबीर, साखर घालून पाच ते सात मिनटे भात परतवा. वरून गरम पाणी घाला आणि उकळी आल्यावर गॅस मंद करा. बारा ते पंधरा मिनीटे वाफ द्या.
9. कोशिंबीर रेसिपी (Koshimbir Recipe In Marathi)
नैवेद्याच्या जेवणात कोशिंबीर ही असावीच. कारण तळलेले पदार्थांसोबत कोशिंबीर खाण्याचा नेहमीच फायदा होतो. कोशिंबीरीमध्ये फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या आहाराचा उत्तम समतोल साधला जातो.
कोशिंबीरीसाठी लागणारे साहित्य –
काकडी, शेंगदाण्याचे कूट, साखर, मीठ, लिंबू रस, हिरवी मिरची
कोशिंबीर करण्याची कृती –
काकडीचे तुकडे न करता ती हातात घेऊन सुरीने कोचावी आणि मग कापावी. पूर्ण काकडी कोचून झाली की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, साखर, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू रस हे घालावं. त्यानंतर तुम्हाला आवडत असल्यास, तूप नाहीतर तेलाची फोडणी वरून द्यावी. यामध्ये तूप वा तेल तापल्यावर त्यात मोहरी, जिरं, हिंग घालावं आणि वरून फोडणी दिल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करावं.
10. मिक्स भाज्यांचे लोणचं
वर्षभराच्या साठवणीच्या पदार्थात तयार केलेलं अथवा बाजारात तयार मिळणारं लोणचं आपण नेहमीच खातो. मात्र जर तुम्ही गुढीपाडव्यानिमित्त जेवणाचा खास बेत केला असेल तर झटपट तयार होणारं मिक्स भाज्यांचं लोणचं जरूर खा.
मिक्स भाज्यांचे लोणचे तयार करण्याचे साहित्य –
गाजर, फ्लॉवर, मटार, मीठ, तिखट, हळद, हिंग, मेथी, मोहरी, लिंबाचा रस, तेल
मिक्स भाज्यांचे लोणचे करण्याची कृती –
गाजर, फ्लॉवर, मटार एकत्र करा. त्यात मीठ, लाल तिखट, हळद, हिंग टाकून चांगले मिक्स करा. मोहरीची जाडसर पावडर करून त्यात टाका. तेलाची फोडणी तयार करा. त्यात मेथी, मोहरी घालून फोडणी द्या आणि ही फोडणी भाज्यांवर पसरवा. लिंबाचा रस घालून लोणचे तयार करा.